अन्नदाता

 

काटा पायात रुतून

लाल रगाद सांडलं

रोज गणिक रं तुझ्या

दुःख भाळी कोरलेलं


अनवाणी पायांनी रं

रोज तुडवतो रस्ता

तुरं जगाचा पोशिंदा

तरी खातोस रं खस्ता


तू होऊनी सारथी

शेतामधी राबतोशी

पोट भरण्या साऱ्यांचे

राहतोशी तू उपाशी


तुला भीती ना मुळीही

किड्या अन रं मुंग्यांची 

औत हाकताना तुला

काटे नि धसकट्याची


राब राबून उन्हात

किती चटके सोसतो

सदा दुष्काळ नशिबी

निसर्गही का कोपतो


तू रं चालून चालून

पाय किती भेगाळलं

तुझ्या अंतरीचे दुःख

नाही कुणी रं जाणलं


किती सोसणार आता

पोळलास वेदनांनी

तुझी कदर कुणाला

अन्नदाता तू असुनी

Comments

Popular posts from this blog

गझल.... जुन्या विश्वात जाऊ

आला दिवाळीचा सण